Sharad Mohol Murder Case : पुण्यातील (Pune Crime News) गँगस्टर शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येमागे दहशतवाद्याचा हात असल्याचा आरोप काही संघटना करत असल्या तरी पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणात भाजपचा (BJP) पदाधिकारी असलेल्या विठ्ठल शेलारसह (Vitthal Shelar) 24 जणांना अटक केली आहे. शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार हे दोघेही भाजपशी संबंधित होते. मात्र दोघांमध्ये मुळशी तालुक्यातील वर्चस्वाचा वाद या हत्येला कारणीभूत ठरल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे. त्याचबरोबर शरद मोहोळच्या हत्येला मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) वेगरे गावच्या सरंपचपदाचा वाद देखील कारणीभूत ठरल्याचं समोर आले आहे.
पुण्यातून लवासा (Pune Lavasa) सिटीकडे जाताना वाटेत लागणारं मुठा नावाचं (Mutha, Mulshi) गाव हे शरद मोहोळच तर तिथून पुढे पंचवीस किलोमीटर अंतरावरील वेगरे (Vegre, Mulshi) नावाचं गाव शरद मोहोळची हत्या घडवून आणणाऱ्या नामदेव कानगुडेच (Namdev Kangude) तर मुठा गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेलं उरवडे गाव (Urwade) आहे. या हत्येतील दुसरा मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलारचे आहे. मुळशी खोऱ्यातील या लहान – लहान गावांमध्ये वर्चस्व कोणाचं राहणार यातून निर्माण वादातून शरद मोहोळची हत्या झाल्याचं समोर आले आहे.
वेगरे गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील वाद (Vegre Gram Panchayat Election)
2010 मध्ये नामदेव कानगुडेकडून स्थानिक वादातून शरद मोहोळच्या मावस भावाला मारहाण करण्यात आली. शरद मोहोळने त्याचा बदला घेण्यासाठी नामदेव कानगुडेला मारहाण केली. पुढे दोघांमध्ये समझोता झाला आणि दोघे एकत्र काम करायला लागले. मात्र मागीलवर्षी वेगरे गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत नामदेव कानगुडेची भावजय निवडणुकीला उभी राहिली. कनगुडेने शरद मोहोळकडे त्यासाठी मदत मागितली. मात्र ती न मिळाल्यानं दोघांमध्ये वाद झाला. त्यातून अपमानित झालेला नामदेव कानगुडेला रडताना त्याचा भाचा असलेल्या साहिल पोळेकरने पाहिलं आणि दोघांनी मिळून शरद मोहोळचा काटा काढायचं ठरवलं .
2022 मध्ये शेलारच्या गाडीवर मोहोळ गँगचा हल्ला
शरद मोहोळच्या टोळीतील धुसफूस शरद मोहोळचा विरोधक असलेल्या विठ्ठल शेलारला समजली. 2017 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या विठ्ठल शेलारची टोळी हिंजवडी आय टी पार्कच्या परिसरात सक्रिय होती. मात्र 2021 ला तुरुंगातून सुटून आल्यानंतर शरद मोहोळने शेलारच्या एरियात शिरण्याचा करण्याचा प्रयत्न केला. त्यातून झालेल्या वादातून शेलारच्या गाडीवर शरद मोहोळच्या साथीदारांनी हायवेला असलेल्या सयाजी हॉटेलजवळ ऑक्टोबर 2022 मध्ये हल्ला केला. विठ्ठल शेलारला त्यावेळी जीव वाचवून पळ काढावा लागला .
विठ्ठल शेलारने नामदेव कानगुडेला केली मदत
एव्हाना शरद मोहोळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि विठ्ठल शेलार तर आधीपासूनच भाजपमध्ये होता. मात्र एकाच पक्षात असलेल्या या दोघांच्या टोळ्यांमधील संघर्ष वाढत चालला होता. त्यातूनच विठ्ठल शेलारने नामदेव कानगुडेला शरद मोहोळची हत्या आणि कट रचण्यात मदत केली. तर अवघ्या वीस वर्षांच्या साहिल पोळेकरने शरद मोहोळवर गोळ्या झाडून मामाचा बदला घेतला. त्यासाठी पोळेकरने अनेक दिवस शरद मोहोळच्या पुढे मागे करून त्याचा विश्वास संपादन केला.
आतापर्यंत 24 आरोपींना अटक
पुणे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 24 आरोपींना अटक करून हा हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. दुसरीकडे शरद मोहोळच्या हत्येमागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात पुणे पोलीस योग्यरितीने तपास करत असल्याच स्पष्ट केलंय.
मारणे गँगने घेतला 2010 बदला?
शरद मोहोळने किशोर मारणेची 2010 मध्ये हत्या करून त्याचा बॉस संदीप मोहोळच्या हत्येचा बदला घेतला होता. किशोर मारणेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मारणे टोळीने देखील शरद मोहोळच्या हत्येसाठी नामदेव कानगुडेला मदत केल्याचा पोलिसांना संशय असून त्यादिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे .
गुन्हेगाराला ना जात असते ना धर्म , न त्याला पक्षाचं लेबल लागू शकतं . गुन्हेगार हीच त्याची जात असते . पुणे पोलिसांचा आतापर्यंतचा याप्रकाणातील तपास याला पुष्टी देणारा आहे . काही संघटना जरी या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत असल्या तरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील पुणे पोलीसांनी शरद मोहोळच्या हत्येची खरी कारणं समोर आणली आहेत. ज्याची हत्या झाली तो शरद मोहोळ आणि ज्याच्यावर हत्येचा आरोप आहे तो विठ्ठल शेलार हे दोघेही भाजपाशीच संबंधीत आहे.