भोरः तालुक्यातील ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास पुणे व सातारा जिल्हा संच संलग्न, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने भोर येथे शंखध्वनी आंदोलन करणार असल्याचा इशारा संघाच्या वतीने देण्यात आला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस, तीन महिन्यांचे थकीत वेतन, राहणीमान भत्ता, साहित्यांचा पुरवठा आदी मागण्या १५ आक्टोबरपर्यंत मान्य करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यानंतर १६ आक्टोबरच्या दिवशी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत मंगळवारी ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने भोरचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघाचे संस्थापक ज्ञानोबा घोणे, भोर तालुका अध्यक्ष प्रदीप खोपडे, उपाध्यक्ष मुनीरभाई शेख, संस्थापक महमंदभाई शेख, विजय कन्हेरकर, मनोज कांबळे, राजेंद्र किंद्रे, संदेश दुधाणे, अनुसया कुंभार, कौसल्या मोरे, नर्गीस शेख, शांताराम प्रधान, दत्तात्रेय पिलाणे, प्रभाकर खोपडे, अमोल वाघ, आबा धोंडे, विलास कानडे, किसन धानवले, दत्तात्रेय भालेघरे यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत शासनाने १ आक्टोबर रोजी आदेश जारी केला आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे थकीत वेतन तत्काळ मिळावे, १ जुलै २००७ पासून राहणीमान भत्ता मिळावा, कामात वापरण्यासाठीचे गमबुट, रेनकोट, छत्री, बॅटरी या साहित्यांचा पुरवठा व्हावा, या मागण्या तातडीने मान्य कराव्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मागण्या मान्य न झाल्यास १६ आक्टोबर रोजी तालुक्यातील कर्मचारी पंचायत समितीसमोर शंखध्वनी, बोंब ठोकणे आंदोलन केले जाईल. तसेच हे आंदोलन करूनही मागण्या मान्य न झाल्यास तालुक्यातील कर्मचारी व त्यांचे कुटुंब, नातेवाईक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे.